विनामास्क फिरस्त्यांकडून ११ लाख वसुली !

Foto
औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र तरीही अनेक नागरिक शासनाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवतांना दिसत आहेत.अशा बेजबाबदार नागरिकांविरोधात महानगरपालिकेने १ जूनपासून कडक मोहिम हाती घेतली आहे.१ जून ते ८ जुलै या कालावधीपर्यंत विनामास्क फिरणाऱ्या तब्बल २ हजार ३६४ नागरीकांकडून ११ लाख ८२ हजार रूपयांचा दंड मनपाने वसुल केला आहे.

 याशिवाय रस्त्यांवर थुंकणारे, कचरा टाकणारे, प्लास्टीक बंदी असतानाही त्याचा वापर करणारे, दुकानात गर्दी करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियम घालून दिले आहेत. मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय  देखील रस्त्यांवर उतरून विना मास्क फिरणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले होते. याशिवाय मनपाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती केली आहे. मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी मित्र पथक प्रमुख प्रमुख प्रमोद जाधव व त्यांच्या टीम सदर कारवाई करत आहेत. 

१ जून ते ८ जुलैपर्यंत झालेली कारवाई : 

- रस्त्यावर थुंकणाऱ्या १ हजार ४५८ नागरिकांकडून १०० रुपयांप्रमाणे १ लाख ४५ हजार ८०० रूपये
- विनामास्क फिरणाऱ्या २ हजार ३६४ नागरीकांकडून प्रत्येकी ५०० रूपयांप्रमाणे ११ लाख ८२ हजार रूपये
- रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्या ६८० नागरीकांकडून प्रत्येकी १५० रूपयांप्रमाणे १ लाख २ हजार रूपयांची दंडात्मक रक्कम वसूल केली.
- प्लास्टीकचा वापर करणाऱ्यांकडून २५ हजार 
- दुकानात गर्दी करणाऱ्यांकडून  ५२ हजार ५०० रुपये
- विना परवानगी बांधकाम करणाऱ्यांकडून ५००० रुपये
- बायोवेस्टची विल्हेवाट न लावणे  १०,००० रुपये
- जास्तीचा कचरा करणे  २७ हजार ७०० रुपये
--------------------------- 
* १ जूनपासून आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही काम करत आहोत. मात्र अजूनही नागरिक मास्क वापराबाबत जागृत नाही.१० रुपयांना मास्क भेटतो पण मी का घालू ?असे म्हणतात. काही जण मास्क गळ्यात अडकवतात.यामध्ये वकील, डॉक्टर अनेक शिकलेले नागरिक देखील आहेत.मास्क वापरल्यामुळे होणारे दुष्परिणाम ते सांगतात.मात्र रस्त्यावर मास्क वापरणे बंधनकारक आहे. काही विशिष्ट भागांमध्ये लोकं मुद्दाम रस्त्यावर मास्क न लावता गप्पा मारत बसतात.आपले मनपा आयुक्त जीव तोडून काम करत आहेत तर नियम पाळणे हे नागरिकांचे सुद्धा कर्तव्य आहे. 
- प्रमोद जाधव, प्रमुख नागरी मित्र पथक मंडळ